फोन टॅपिंग प्रकरण : फडणवीस सांगतात, मी तर दोनच पाने दिली, पण बाकीची…
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे अर्थकारण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा हवाला देत फडणवीस यांनी हा आरोप केला होता. तथापि, आपण केवळ पाने जाहीर केली होती, बाकीचा अहवाल सरकारकडूनच फोडण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सादर केला. त्यात रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी ज्या कालावधीचा उल्लेख केला आहे, त्या काळात बदल्या झाल्याच नसल्याचेही कुंटेनी आपल्या अहवालात म्हटले आहे. यावरून नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, वास्तवात हा अहवाल नवाब मलिक यांनींच फोडला. मी तर, पहिली दोन पानेच दिली होती. नवाब मलिक हे आता काय चिंतीत आहेत, याची कल्पना मला आहे. फोन टॅपिंगचा अहवाल आपण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दिला आहे. त्यामुळे त्यामुळे अनेकांचे बिंग फुटण्याची चिन्हे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सचिन वाझे प्रकरणानेच महाराष्ट्राची बदनामी जास्त झाली आहे. सिंडिकेट पद्धतीने कारभार चालवल्याने, बदल्यांमागचे अर्थकारण आणि वाझे सारख्यांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट कारभार चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाले. म्हणूनच वाझेचे जे मालक आहेत, ते आज चिंतेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.