बंडखोरी दरम्यान उद्धव ठाकरेंनी केला होता संपर्क...; फडणवीसांचा पुन्हा मोठा गौप्यस्फोट
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरून जुंपलेली असताना दुसरीकडे एकापाठोपाठ राजकीय मंडळींकडून गौप्यस्फोटाचे सत्र सुरु आहे. नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले होते. या विधानावरून गोंधळ सुरु असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एक गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला उद्धवजींनी संपर्क केला होता. असे विधान त्यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांना शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना संपर्क केला होता का? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना ते म्हणाले की, संपर्क तर झालाच होता. त्यानंतरही झाला होता. पण त्यावेळी मी उत्तर दिले की आम्ही आता खूप पुढे निघून गेलो आहे. त्या क्षणी मला असेही सांगण्यात आले की जाऊदेत आता झाले ते झाले तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यावेळी मी स्पष्टपणे सांगितले की आता वेळ गेली आहे. मी धोका देणाऱ्यांपैकी नाही. जे लोक आमच्यासोबत आले आहेत त्यांना आम्ही तोंडघशी पाडू शकत नाही. एकनाथ शिंदे आणि इतर आमदार बाहेर पडल्यावर आणि आमच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही त्यांना तोंडघशी पाडण्याचा काही प्रश्नच येत नाही हे उत्तर मी दिले आणि तुमचे इतर काही असेल तर दिल्लीत बोला असेही मी त्यांना सांगितले. असा मोठा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस केले.