माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, 'त्या' व्हिडिओवर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण
प्रहार अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. यावेळी मात्र वेगळ्या कारणामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्याला कानशिलात लगावलेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरच आता प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी त्या कार्यकर्त्यांना मारलं नाही. पण तो व्हिडीओ तोडमोड करून विरोधकांकडून व्हायरल केल्या गेला. बातमीच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी त्या कार्यकर्त्याला फक्त थांब म्हटलं. याला मारहाण म्हणत नाही. थांब म्हणणं आणि मारहाण करणं यात फरक असतो. आमचं कार्यकर्त्यांसोबत कौटुंबीक नातं आहे. असे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी प्रकरणावर बोलताना दिली.
काय म्हणाला तो कार्यकर्ता?
आपण बच्चू कडू यांच्यासोबत अनेक दिवसांपासून काम करत आहोत. काही विरोधक आपला राजकीय डाव साधण्यासाठी अशा प्रकारच्या व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल करत आहेत. कुठलाही वाद झाला नसून बच्चू कडू यांनी मला मारलं नसल्याचा खुलासा व्हिडिओ मधल्या कार्यकर्त्याने केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुकास्थित गणोजा गावात बच्चू कडू रस्ता उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या कामकाजा संदर्भात कडू आणि कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली होती. त्या वेळेचा तो व्हिडिओ होता.