मोठी बातमी! शरद पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस
मुंबई : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले होते. अशातच, शिंदे गटापाठोपाठ अजित पवार यांनीही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात पक्ष आणि चिन्हावरुन राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी सामना पाहायला मिळणार आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला होता. याप्रकरणी अजित पवार गटाने काहीच दिवसांपुर्वी निडणूक आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर शरद पवार गटाला आयोगाने नोटीस दिल्याचे समजत आहे. अजित पवार गटाच्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने शरद पवारांना नोटीस दिली आहे.
तर, राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी एकसंध राहण्यासाठी ही भेट घेत असल्याची माहितीही देण्यात आली होती. परंतु, शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर आज निवडणूक आयोगाने शरद पवारांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी शपथविधानंतर पक्ष आणि चिन्हाबाबत मोठे विधान केले होते. राष्ट्रवादी पक्ष माझ्यासोबत, पक्ष आणि चिन्ह माझ्याकडेच असून येणाऱ्या निवडणूका आम्ही राष्ट्रवादीकडूनच लढणार आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.