राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची पुढील सुनावणी 'या' तारखेला
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप करत जोरदार युक्तीवाद केला आहे. तर, शरद पवार गटानेही प्रतिवाद केला आहे. यानंतर पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगात शरद पवार यांच्याकडून अभिषेक मनू सिंघवी तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह हे युक्तिवाद केला आहे. पक्षात यापूर्वी झालेल्या नियुक्त्या पक्ष घटनेला धरून नाहीत. ज्यांच्याकडे संख्याबळ अधिक, त्यांना पदाधिकारी नियुक्ती करण्याचे अधिकार असतात. पक्षाच्या घटनेचे पालन व्यवस्थित होत नाही. विधानसभेचे 42, विधानपरिषदेचे 6 आणि आमदार आमच्यासोबत असून लोकसभा, राज्यसभेचे प्रत्येकी 1-1 खासदार आमच्यासोबत आहेत. शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. जयंत पाटलांची निवड बेकायदेशीर आहे. तसेच, शरद पवारांची निवड घटनेला धरून नाही, असाही दावा अजित पवार गटाने केला आहे. तसेच, अजित पवार गटाने शिवसेना निर्णयाचा संदर्भ निवडणूक आयोगाला दिला आहे.
तर, राष्ट्रवादीवर अजित पवार दावा करू शकत नाही. राष्ट्रवादी पक्ष पवारांनी स्थापन केला आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे सर्वांना माहिती आहे. एक गट बाहेर पडला असला तरी मूळ पक्ष आमच्याकडे असून 24 प्रदेशाध्यक्ष, बहुसंख्य आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा असल्याचे शरद पवार गटाने म्हंटले आहे. शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड पक्षघटनेला अनुसरून केली आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय डावलता येणार नाही. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडे ठेवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका, अशी विनंतीही शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला केली आहे.