एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोन पे चर्चा; म्हणाले...
मुंबई : एकनाथ शिंदे हे दहा ते बारा आमदारांसह सोमवारपासून नॉट रिचेबल आहेत. अशात शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले असून ते भाजपच्या मार्गावर असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. अशात शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिंदेंची गटनेतेपदावरुन हकलपट्टी केली आहे. यावरुन एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद साधला आहे.
एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांनी सुरतमध्ये हॉटेलवर त्यांची भेट घेतली होती. अर्धा तास तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी नार्वेकरांच्या फोनवरुन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यामध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करा, अशी प्रमुख अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचे समजते आहे.
तर, मी वेगळा पक्ष काढलेला नाही अथवा मी स्थलांतरही केलेले नाही. तरी मला गटनेते पदावरून का हटवण्यात आले, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, संजय राऊत यांच्यावरही शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत माध्यमांसमोर एक बोलतात आणि प्रत्यक्षात एक बोलतात, असा आरोपच एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर केला आहे. एकनाथ शिंदे यांचा गैरसमज झाला असे म्हणणारे अपहरण का केलं असं का म्हणतात, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला आहे. यावर लवकरच मी माझी भूमिका कळवेल, असेही एकनाथ शिंदेनी म्हंटले आहे. तर रश्मी ठाकरे यांच्याशीही संवाद साधल्याचे समजते आहे.
दरम्यान, शिवसेना नेत्यांची बैठक गुलाबराव पाटलांच्या बंगल्यावर होणार आहे. शिंदे समर्थक असलेल्या संजय राठोड, संतोष बांगर या आमदारांची मनधरणी करणे सध्या शिवसेना नेत्यांकडून सुरू आहे. शिवसेना गटनेते म्हणून अजय चौधरींच्या नियुक्तीचं पत्रं सभापतींकडे पाठवलं.