प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नागपूर : राज्यात वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु झाली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यानंतर यात आणखी एका नावाची भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. यावरुन भाजपवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, मला खूप आनंद आहे समाधान आहे की अतिशय मोठ्या अशा या राज्यातल्या देशतील गेम चेंजर प्रकल्पावर आम्ही काम केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाची सुरुवात झाली. मी भाग्यवान आहे की मी त्यावेळी या विभागाचा मंत्री होतो. मला ती जबाबदारी मिळाली व काम सुरू झाले. आणि त्याच्या लोकार्पण उद्घाटनाला देखील मला संधी मिळाली. त्यामुळे मी आणि देवेंद्र फडणवीस भाग्यवान आहोत.
खरं म्हणजे मुंबई-पुणे हा महामार्ग देशातील कंट्रोल रोड बाळासाहेबांच्या नावाने सर्वप्रथम झाला. त्यावेळी तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी तो पूर्ण केला. नागपूर-मुंबई रस्ता हा गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे 18 ते 16 तासांचे अंतर सहा ते सात तासांवर येणार आहे. यामुळे उद्योग वाढतील व शेतकऱ्यांना मदत होईल. दहा जिल्हे प्रत्यक्षपणे आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहे. हा प्रकल्प हा संपूर्ण समृद्धी देणारा असून त्या समृद्धी महामार्गाला हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेले आहे त्याचं मला समाधान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी तुम्ही विचारा तर हिंदवी स्वराज्याची जी स्थापना झाली ती केली. आणि संपूर्ण आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले आणि रायगडावरती त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामुळे ती सुरुवात कोकणात झाली, असे विधान त्यांनी केले आहे. यादरम्यान, उपस्थितांनी प्रसाद लाड यांना शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले विधान दुरुस्त न करता त्यांनी पुढील विधाने सुरु ठेवली.