Eknath Shinde : मोदी सरकार आमच्या पाठीशी ठामपणे उभे
मुंबई : काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) सोबत सरकार स्थापन झाले. पण, त्यामुळे हिंदुत्व, सावरकर, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊद इब्राहिम यांसारखे मुद्द्यांवर आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी म्हंटले आहे. तसेच, केंद्र सरकार आमच्या पाठीशी ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उध्दव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, (ऑटो) रिक्षाने मर्सिडीजला मागे सोडले आहे. कारण हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे आणि सर्व घटकांना न्याय देईल. प्रत्येकाला आपले सरकार वाटेल अशा पद्धतीने आम्ही काम करू. आणि हाच आताच्या व पुर्वीच्या सरकारमध्ये फरक असेल, अशी टीका त्यांनी केली.
आमच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कामे करण्यात अनेक अडचण आल्या. कारण मित्र पक्ष त्यांच्याकडून पराभूत झालेल्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, आमचे आमदार निधीअभावी विकासकामे करू शकले नाहीत. आम्ही वरिष्ठांशी (उध्दव ठाकरे) बोललो. पण, उपयोग झाला नाही, असेही त्यांनी सांगितले.
2019 मध्ये आम्ही भाजप सोबत निवडणूक लढवली. पण, काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन झाले आणि त्यामुळे जेव्हा हिंदुत्व, सावरकर, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊद इब्राहिम आणि इतर सारखे मुद्दे आले. तेव्हा आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकलो नाही, असेही शिंदेनी स्पष्टच सांगितले.
पंतप्रधान मोदींनी मला राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यास सांगितले आणि केंद्र सरकारसह ते आमच्या पाठीशी उभे असल्याचेही सांगितले. खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासोबत आमची निवडणूकपूर्व युती असल्याने आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
भाजप सत्तेसाठी काहीही करते असा जनमानसाचा समज होता. पण त्यांनी दाखवून दिले की या ५० लोकांनी (शिंदे गटाने) हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आणि त्यांचा अजेंडा विकास आणि हिंदुत्व आहे. जास्त आमदार असूनही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. आम्ही काहीही बेकायदेशीर करत नाही. नियम, कायदे आणि राज्यघटना आहेत आणि त्यानुसार आपल्याला काम करायचे आहे. आज, आमच्याकडे 2/3 पेक्षा जास्त बहुमत आहे, त्यामुळे आमचा निर्णय कायदेशीर आहे. जे आमच्या विरोधात सुप्रीम कोर्टाेत गेले. त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.