'समाजाच्या सेवेचा मार्ग आप्पासाहेबांनी दाखवला, म्हणून आज मी मुख्यमंत्री'
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण 2022चा पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सरकार म्हणून आम्ही आप्पासाहेब यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांची सेवा करतोय. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा, असे म्हणत धर्माधिकारी यांचे कौतुक केले.
आपण सगळे आप्पासाहेब यांचे कुटुंबिय व परिवार आहोत. एवढ्या मोठ्या महासागरासमोर काय बोलावे हे शब्द सुचत नाहीत. मी मुख्यमंत्री म्हणून नव्हे सर परिवारातील श्री सदस्य म्हणून उभा आहे. मानाचा पुरस्कार गृहमंत्र्यांनी प्रदान केला आहे. आप्पासाहेबांना भेटतो तेव्हा संघर्षाचे बळ मिळते. याठिकाणी महासागर लोटलाय. सूर्य आग ओकतोय तरीही एकही माणूस जागचा उठत नाही. ही आप्पासाहेब यांची ताकद आहे. शिस्त याठिकाणी पाहायला मिळत आहे. शिस्तीचे पालन प्रत्येक श्री सदस्य करत असतो. माझी पत्नी, श्रीकांत हे श्री सदस्यांत बसले आहेत. इथे लहान-मोठे कोणी नाही
सगळे आप्पासाहेब यांचे श्री सदस्य आहेत. परवा रात्रीपासून ही माणसं प्रेमापोटी इथे आली. मैदान भरले आहे, त्यामागे असलेली मैदान भरली आहेत. हे आठवे नव्हे तर नववे आश्चर्य आहे. राजकीय अधिष्ठानाला धार्मिक अधिष्ठानाची प्रेरणा लागते. हा रेकॉर्ड फक्त आप्पासाहेब यांचे श्री सदस्यच मोडू शकतात. हा अथांग महासागरात आप्पासाहेबांच्या रुपात देव दिसतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
२००८ साली नानासाहेब यांना महाराष्ट्र भूषण जाहीर झाला. पण ते सोडून गेल्यामुळे २०१०मध्ये आप्पासाहेब यांनी तो पुरस्कार स्वीकारला. आज त्याच मैदानावर आप्पासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला हा दैवी योगायोग आहे. अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाची ज्योती लावण्याचे काम हे कुटुंब करत आहे. लाखो कुटुंबात माझे एक कुटुंब होते. जेव्हा दुखाचा डोंगर कोसळला, तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी आधार दिला. समाजाची सेवा करण्याचा मार्ग आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दाखवला. म्हणून आज मुख्यमंत्री म्हणून मी उभा आहे. त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
सागराला देखील लाजवेल असा महासागर आपण पाहतोय. पुरस्कार देण्यासाठी जे व्यक्तीमत्व येथे आलय ते पण एक कडवट राष्ट्रभक्त व देशभक्त आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न याच अमित शाह यांनी साकारले. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. रामायण, महाभारत, शिव पुराण यांचा दांडगा अभ्यास आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
सरकार म्हणून आम्ही आप्पासाहेब यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांची सेवा करतोय. माणूस घडवण्याचे विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा. धर्माधिकारी कुटुंब हे भरकटलेल्यांना दीपस्तंभ दाखवणारे कुटुंब आहे. या पुरस्काराने महाराष्ट्राची उंची वाढली आहे. मी मुख्यमंत्री असताना हा पुरस्कार आप्पासाहेब यांना दिला जातोय. याहून दुसरा आनंदाचा क्षण माझ्या आयुष्यात नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.