एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन; 'या'वर झाली चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट अशा न्यायलयाची लढाईला आजपासून सुरुवात होणार आहे. पण, एक दिवस आधीच एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाईला आजपासून सर्वोच्च न्यायलायात सुरुवात होणार आहे. १६ बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटीसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर आज सुनावणी होणार असून दोन्ही पक्षांकडून यासंदर्भातील तयारी सुरु झाली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. रविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली.
राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी, अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचं समजतं. या फोन कॉलदरम्यान राजकीय चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, रविवारी एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. अशा शब्दात त्यांनी नेते नवाब मलिक यांचे नाव न घेता टीका केल्याचे दिसत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी खासदार संजय राऊत यांना टॅग केलं आहे. तसेच मी शिवसैनिक असा हॅशटॅगही वापरला आहे.