विरोधकांकडे नोटा जास्त असतील म्हणून...; 2 हजारांच्या नोटा रद्दनंतर एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
पालघर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढल्या आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येणार आहेत. या निर्णयावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून जोरदार टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदे बोईसर येथे आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक विवाह सोहळा कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नोटबंदी हा निर्णय आरबीआयचा असून तो काय सरकारचा किंवा पक्षाचा नाहीये. त्यामुळे विरोधकांनी उगाचच यावर चर्चा करू नये, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. नोटबंदीसाठी आरबीआयने मुदत दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कुठलाही त्रास होणार नाही, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी दिली. विरोधकांकडे नोटा जास्तीच्या असतील म्हणून त्यांना त्रास होतो की काय? असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, 2 हजार रुपयांच्या नोटेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांना सुनावले आहे. 2 हजारची नोट ही सर्क्युलेशन मधूनं बाहेर काढण्याचा निर्णय झालाय. त्याला काय आता अवैध ठरवलेलं नाहीये. यामुळे ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील त्यांच्याकडे पांढरा पैसा असेल. अशा कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. कोणी काळा पैसा जर जमा करून ठेवला असेल तर त्याला बदलताना त्रास नक्कीच होणार आहे, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.