...त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप करताहेत; शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
ठाणे : वीर सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ आज ठाणे शहरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थिती दर्शवत संपूर्ण ठाणे शहरात या यात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेवर निशाणा साधला आहे. तसेच, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
सावरकर गौरव यात्रेत हजारो देशभक्त, स्वातंत्र्यप्रेमी सहभागी झाले आहेत. प्रचंड मोठी गौरव यात्रा सुरु झालेली आहे. यामधून जनतेच्या घराघरात स्वातंत्र्यावीरांचा त्याग, बलिदान आंदोलन व कार्य पोहोचविले जाईल. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचा अपमान जाणीवपूर्वक, वारंवार माफीवीर म्हणून केला आहेत. त्यांची निंदा करावी तेवढी कमी आहे. निषेध करावा तेवढा कमी आहे. मी त्यांचा जाहीर धिक्कार करतो, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
महाविकास आघाडीची सभा घेण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. पण, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संभाजीनगरची घोषणा केली. त्या संभाजीनगरमध्ये वीर सावरकरांचा अपमान जे करत आहेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप हे लोक करत आहेत. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे ते नक्कीच उत्तर देणार, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होणार आहे. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक मंडळ मैदानवर ही सभा होणार आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून सभेला मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळं या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. या सभेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.