एवढा हलका वाटला का एकनाथ शिंदे; मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबई : गुवाहटीला असताना माझे पुतळे जाळले. कोणीतरी म्हटलं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या घरावर दगड मारा. तेव्हा एकाने आम्ही कार्यकर्ते आणतो. एवढा हलका वाटला का एकनाथ शिंदे, असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला (Shivsena) दिला. कुर्ल्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले की, गुवाहटीमध्ये होते तेव्हा आम्हाला दूषणं देण्यात आली. आम्ही कोणाला काहीच बोलायचं नाही असं ठरवलं. आमच्याकडून बोलण्यासाठी शांत माणूस निवडला. दीपक केसरकर यांना आम्ही आमचा प्रवक्ता केला. त्या माणसाला रागच येत नाही, त्यांना जेवढं बोलायचं तेवढंच बोलतात, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, भाजीपाला विकणारा होता, अमका होता असं बोलतायत. यांनीच तर सेना मोठी केली. आम्हाला काय असा निर्णय घेताना आनंद झाला नाही. दोन पक्षच वाढत गेले. अडीच वर्षे काहीच कामं झालं नाही तर मतदारसंघात जायचं कसं. सरकारमध्ये असून काम होत नसेल तर सरकार काय कामाचं, अशी टीकाही त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली.
त्यावेळी चर्चेला माणसं पाठवली. मिलिंद नार्वेकर आले. परंतु, तिकडे माझे पुतळे जाळले. कोणीतरी म्हटलं एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारा. तेव्हा एकाने म्हटलं तुम्ही कार्यकर्ते आणताय, नाही तर तुम्ही पुढे व्हा आम्ही कार्यकर्ते आणतो. एवढा हलका वाटला का एकनाथ शिंदे, असा इशारा एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला दिला.