उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजेला विरोध नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अजित पवार की देवेंद्र फडणवीस? असा पेच मंदिर समितीसमोरही निर्माण झाला होता. मात्र, आता या दोघांपैकी कोणालाच निमंत्रण न देण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे समजते. मराठा आरक्षण मुद्द्यावर सुरु असलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला प्रक्षोभ पाहता मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही.
एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा. सारा परिसर जयघोषाने दुमदुमुदे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, मराठा समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्याचा परिणाम विविध संस्था, व्यवसाय आणि सण उत्सवांवरही होतो आहे. अशातच, पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. परिणामी मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता मंदिर समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने आगोदरच इशारा दिला होता की, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पूजा करु देणार नाही. कार्तिकी एकादशीनिमित्त एक मानाचा वारकरी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रक्मिणी पूजा करण्याचा प्रघात आहे.