नरेंद्र मोदींनी जे काल सांगितले ते अर्धसत्य; एकनाथ खडसे
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवारी संध्याकाळी एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. यावेळी मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही. शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रातूत माझ्यावर टीका करण्यात आली. काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. नरेंद्र मोदी जे बोलले ते अर्ध सत्य बोलले. मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण झालं होतं. त्यावेळेस भाजप सेनेचे सरकार येईल असा विश्वास आम्हाला होता. त्यावेळेस अनेक लोकं भाजपमध्ये यायला लागले होते तिकीट मागायला लागले होते. तेव्हा चर्चा सुरू झाली . भाजपने एकट्याने निवडणुका लढवाव्या असे मत झालं.
त्यावेळेस मुंबईला तातडीने बोलावलं. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी अध्यक्ष होते.त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी सोपवली. मी उद्धव ठाकरे यांना फोनकरून सांगितलं. जागा वाटपावरून जमत नसल्याचे कारण सांगून मी ती युती तोडली. देसाई आणि सावंत आले होते युती तोडू नका म्हणून सांगितलं. तेव्हा मी सांगितले माझा नाही हा पक्षाचा निर्णय होता. नरेंद्र मोदींनी जे काल सांगितले ते सत्य नाही. असे खडसे म्हणाले.