साडे नऊ तासाच्या चौकशीनंतरही मुश्रीफांना ईडीचे समन्स
राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना दुसरीकडे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकली. मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून दीड महिन्यात तीन वेळा छापेमारी करण्यात आली. आज दिवसभरात आमदार मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी केली आहे. या चौकशीनंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांना ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे. नऊ तास चौकशीनंतर आता पुन्हा एकदा सक्तवसुली संचलनालयाकडून मुश्रीफ यांना समन्स बजावण्यात आलं आहे.
मुश्रीफ यांना सोमवारी 13 मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आज दिवसभरातील कारवाईनंतर हसन मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सोमवारी थेट चौकशीला सामोरे जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आजकागलमध्ये तिसऱ्यांदा छापेमारी केली. त्यामुळे मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी देखील चर्चा रंगली आहे. आजच्या साडे नऊ तासाच्या चौकशीनंतर सायंकाळी 4 वाजून 35 मिनिटांनी ईडीचे पथक मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले.