संजय राऊतांच्या दुसऱ्या घरीही ईडीचा छापा; अडचणी वाढल्या
ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र, यानंतर आज दिल्लीतील ईडीचे अधिकारी मुंबईत दाखल होत थेट भांडूप येथील संजय राऊतांचे घर गाठले. व सकाळपासून राऊत आणि कुटुंबियांची चौकशी सुरु आहे.
तर, संजय राऊत यांच्या कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या घरावर छापा पडल्याचं कळताच शिवसैनिकांनी त्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या आंदोलना करण्यास सुरुवात केली. याचवेळी संजय राऊत यांनी खिडकीतून हात उंचावले त्यावेळी बंगल्याबाहेर असलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.