शिवसेनेचा दसरा मेळावा; राऊतांचा शिंदे गटावर आणि भाजपवर घणाघात
दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे. मागच्या अनेक वर्षात ही परंपरा मोडलेली नाही. परंतु, साधारण दीड वर्षभरापूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटात पक्ष आणि चिन्हापासून ते दसरा मेळाव्यावरून चांगलीच जुंपल्याचे दिसून आले. त्यानंतर शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र, तेव्हा शिंदेंना परवानगी मिळाली. तर यंदाही उद्धव ठाकरेंचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार आहे. यावरच बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
दसऱ्या मेळाव्याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळावा एकच, काही चायनिज भेळच्या गाड्या इकडे तिकडे लावत असतात. ते काय खरं चायनिज नसतं, ड्युप्लिकेट माल खुप असतो बाजारात, दसरा मेळावा परंपरेने शिवतीर्थावर होतोय शिवसेनेचा, त्याच दसरा मेळावात महाराष्ट्राला विचार आणि दिशा देण्याचे काम सुरू होते. ते बाळासाहेब असताना देखील सुरू होते आणि आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात देखील सुरू आहे. आता दुसरे काय करतात त्यावर आम्हाला बोलण्याची गरज नाही. असा घणाघात त्यांनी शिंदे गटावर केली.
मी आधी म्हणालो की, ड्युप्लिकेट माल बाजारात येतो काही काळ राहतो. त्यामुळे आमचं लक्ष परवाच्या दसऱ्या मेळाव्यावर आहे. त्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिवतीर्थावर जाऊन पाहा जनसागर उसळणार आहे. 2024 च्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातील, देशातील ही दसरा मेळाव्यातून होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्व देशाचे आता लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे भाषणाला कधी उभा राहणार आहे. याची विचारणा केली आहे. बहुतेक दिल्लीत मोदी आणि शाहांना देखील याची उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे काय बोलणार कोणती भूमिका घेणार प्रचंड दहशत सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. असे टीकास्त्र देखील त्यांनी भाजपवर केले.