वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या 'त्या' पदाधिकाऱ्यांची हक्कलपट्टी, मनसेने व्यक्त केली दिलगिरी
काल मुंबादेवीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून वृध्द महिलेला मारहाण करण्यात आली होती. गणपतीचे बॅनर लावण्यावरून महिलेस मारहाण झाली होती. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून लगेचच मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आले होते. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमातुन संताप व्यक्त केला जात होता. कारवाईची मागणी होत असताना आता मनसेने कारवाई केली आहे.
राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केला
मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महिलांचा सदैव आदर केलेला आहे. तशाच प्रकारचा सक्त आदेश कार्यकर्त्यांना सुद्धा दिला असताना सदर घडलेल्या घटनेबाब पक्षाच्या वतीने मी दिलगीरी व्यक्त करीत आहे, असे नांदगांवकर म्हणाले. पक्षाने याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतलेली असून, त्याचा एक भाग म्हणून कामाठीपूरा उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांस पदावरुन पदमुक्त करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. पत्रातून महिलेस मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हक्कालपटी केल्यानंतर, महिलांचा कायम आदर केला गेला पाहिजे असे यावेळी नांदगावकर यांचाकडून मनसे सैनिकांना सांगण्यात आले आहे.
नेमकं काय होत प्रकरण ?
मुंबादेवी येथे पीडित महिला प्रकाश देवी यांच्या मेडीकल समोर मनसे कार्यकर्त्यांकडून खांब उभारून गणपतीचे बॅनर लावण्यात येत होते. यावेळी वृध्द महिलेने विरोध केला असता तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, यावर आता मनसेकडून भूमिका घेण्यात आली आहे.