लोकसभेत पडसाद : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या सीबीआय चौकशीची मागणी

लोकसभेत पडसाद : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या सीबीआय चौकशीची मागणी

Published by :
Published on

सचिन वाझें आणि परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बचे पडसाद आज लोकसभेत उमटले. भाजपाच्या खासदारांनी ठाकरे सरकारवर आरोप करत या सर्व प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली.

भाजपाच्या मनोज कोटक यांनी शून्य प्रहरात मुंबईचे माजी पोलीस आयुकत परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उपस्थित केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर पैसेवसुलीचा आऱोप केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मौन बाळगले आहे. अधिकाऱ्यांमार्फत व्यापाऱ्यांना धमकावण्याचे काम होत असल्याची भावना लोकांमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला. याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याबरोबरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

हा गदारोळ सुरू असतानाच शिवसेनेचा खासदार विनायक राऊत यांनी थेट केंद्र सरकार लक्ष्य केले. गेले 14 महिने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यात त्याला यश आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या रवनीत सिंह बिट्टू यांनीही हाच आरोप केला आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

तब्बल 16 वर्षे निलंबित असलेले आणि जेलमध्ये गेलेले सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा का घेण्यात आले, असा सवाल अपक्ष आमदार नवनीत राणा यांनी केला.

राज्यसभेत कामकाज तहकूब
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे तेथील कामकाज तहकूब करावे लागले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com