बायको जेवढी रुसत नसेल तेवढे मंत्री रुसत आहेत; खातेवाटप नाराजीवरुन सुळेंची जोरदार टोलेबाजी
मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर रविवारी मंत्रिपदांची विभागणीही झाली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी मंत्रीपदे आपल्याकडे ठेवली आणि भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांना मलईदार खाती दिली. यामुळे शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच बायको जेवढी रुसत नसेल तेवढे मंत्री रुसत आहेत, असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
मंत्र्यांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंनी आज हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, घरामध्ये बायको जेवढी रुसत नसेल तेवढे मंत्री रुसत आहेत. याचा फोन बंद, त्याचा फोन बंद, सर्व हस्यास्पद आहे. कधी निवडणुका लागतील याचा भरोसा नाही, अशी सुप्रिया सुळेंनी जोरदार टोलेबाजी केली.
दरम्यान, खाते वाटपात भाजपकडे जास्त खाती गेल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ज्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली आहेत. ते अधिकच अस्वस्थ झाले आहेत. शिवसेने विरोधात बंड केल्यानंतर नव्या सरकारमध्ये चांगलं खातं मिळेल, असे मंत्र्यांना वाटत होतं. मात्र, उलट काही मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाली. तर काहींना आहे त्याच खात्यावर समाधान मानावे लागले आहे. यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याचे समोर येत आहे. अनेकांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटाकडूनही सारवासारव सुरू झाली आहे.