मंत्री सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, नाना पटोलेंची मागणी
राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, शिंदे- फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावर वादग्रस्त विधान करत नव्या वादाला सुरवात केली आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वाढता विरोध बघत त्यांनी तात्काळ माफी देखील मागितली मात्र, वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. आता त्यावरून काँग्रेसने सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सर्वच पातळीवर हा लढा सुरु आहे, महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. 2014ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे ते बोलताना म्हणाले.
सत्तेची मस्ती कशी उतरवायची
पुढे बोलताना ते म्हणाले की, सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती, तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून सावंत यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली.