राष्ट्रवादीकडील गृहखाते शिवसेनेला हवंय? वळसे-पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांवर धाडी टाकणं सुरू आहे. त्यातही शिवसेनेच्या नेत्यांवर सर्वाधिक धाडी टाकल्या आहेत. तपास यंत्रणा एवढ्या सक्रिय झाल्यानंतरही राज्यातील गृहखात्याकडून विरोधकांवर कारवाई केली जात नाही. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची शुक्रवारी मुंबईत भेट होणार आहे. मात्र, या भेटीपूर्वी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे गृहखात्याच्या कामगिरीवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेने गृहखाते हे राष्ट्रवादीकडून काढून आपल्या नेत्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गृहमंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले होते. महाराष्ट्रातील गृहखात्याने कडक होण्याची गरज आहे. आपण आस्ते कमद भूमिका घेत असाल तर आपल्याभोवतीचा फास आवळत आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला दमदार पावले उचलावी लागतील नाहीतर रोज एक खड्डा खणला जात आहे, ही बाब ध्यानात ठेवावी, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या विधानांचा रोख गृहखात्याच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.