जय बेळगाव, जय कर्नाटक विधानावर धीरज देशमुखांकडून दिलगिरी व्यक्त
बेळगाव : मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी झगडत असतानाच, त्यांना महाराष्ट्रातून हवा तेवढा राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचं समोर आले होते. त्यातच लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी बेळगावमधील एका कार्यक्रमात 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. यावरुन राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत होती. यावर अखेर धीरज देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
धीरज देशमुख म्हणाले की, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा लोकार्पण सोहळा असल्याने मी बेळगावमध्ये गेलो होतो. यावेळी केलेल्या भाषणाचा कृपया कोणी चुकीचा अर्थ लावू नये. माझ्या बोलण्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडल्या आहेत.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यामधील राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी नेतेमंडळींनी भाषणंही केली. त्यात आमदार धीरज देशमुखांनी 'जय हिंद जय महाराष्ट्र' म्हणून त्यांचं भाषण संपवलं. पण, त्याच वेळी धीरज देशमुख यांनी 'जय बेळगाव, जय कर्नाटक'चा नारा दिला. यावर बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक नाराज झाल्याचं बोललं जातंय. धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा देऊन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते होती.