देवेंद्र फडणवीसांचा चंद्रपूर दौरा; पूरग्रस्त पाहणी का आमदाराच्या वाढदिवसानिमित्त?
अनिल ठाकरे | चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज चंद्रपूर पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. परंतु, फडणवीसांचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त पाहणी की आमदाराच्या वाढदिवसा निमित्य दौरा असा सवाल नागरिकांमधून विचारण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस आज दुपारी चंद्रपूर दौऱ्यावर जाणार आहेत. चिमूर तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी ते करतील. चिमूर तालुक्यात पुराने थैमान घातले असून सोमवार सायंकाळपासून पूर ओसरायला सुरुवात झाली आहे. स्थानिक भाजप आमदार कीर्ती भांगडीया यांच्या विनंतीवरून फडणवीस आज येत आहेत.
विशेष म्हणजे भांगडीया यांचा आजच वाढदिवस आहे. भांगडीया हे फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि पुराची पाहणी, असा दुहेरी हेतू फडणवीस यांच्या दौऱ्याचा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील पुरपरिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळ फडणवीस यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे सांगितले.