मला अटक करण्याची सुपारीच दिलेली, शिंदेंनाही होती माहिती; फडणवीसांचा दावा
नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला अटक करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न झाले. त्यासाठी तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुपारी दिली होती, असा पुर्नच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यात केला. तर, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील माहिती आहे, असा मोठा दावाही फडणवीस यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
माझ्यावर काहीही करुन गुन्हा दाखल झाला पाहिजे, मला अटक करायचा पूर्ण प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आला. हे शब्द योग्य आहेत की नाहीत मला माहिती नाही. पण याची सुपारीच तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती. पण, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या संदर्भातील काही माहिती आमच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे, असेही वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवेळी राज्यपालांकडून सरकार स्थापनेचं पत्र देण्यात आले नसल्याची माहिती आरटीआयच्या माध्यमातून समोर आल्याची चर्चा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी याची स्वत: माहिती घेतली. या संदर्भातील कागदपत्रे हे सर्वोच्च न्यायालयात केस सुरु असल्याने राज्यपालांजवळ आहेत. पण, ऑफिस जवळ नाहीत. याचा अर्थ कागदपत्रे नाहीत असा होत नाहीत. आम्हाला लेखी पत्र राज्यपालांनी दिलं तेव्हाच सरकार स्थापन झाले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.