शरद पवारांची निवृत्तीची घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली असून यावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. तर, शरद पवारांच्या पुस्तकावरही त्यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार साहेबांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
तर, मी अजून श्री शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणार नाही. मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी लिहिणार आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे, हे मी त्यात मांडीन, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार यांचे लोक माझे सांगती पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. यादरम्यान मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल, असेही शरद पवारांनी म्हंटले आहे.