संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी..; फडणवीसांनी विधासभेत सांगितले
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे. संभाजी भिडे यांच्या महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिले आहे.
संभाजी भिडे यांनी अमरावतीतील भाषणात आपल्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले. त्यावरून त्यांनी काही कमेंट केल्या आहेत. याप्रकरणी अमरावती राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पोलिसांनी भिडेंना नोटीस पाठविली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. याप्रमाणे चौकशी होईल, देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे. यावेळी फडणवीसांनी भिडे गुरूजी म्हंटल्याने विरोधकांनी एकच गदारोळ केला.
कोणत्याही राष्ट्रीय नेत्यासंदर्भात कोणीही अवमानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी, त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात. त्यांचे कार्य चांगले आहे. पण तरीही त्यांना महापुरुषांवर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण केले जाते आहे. संभाजी भिडे यांच्याप्रमाणेचकाँग्रेसच्या मुखपत्रावरही गुन्हा दाखल केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. यावरुन कॉंग्रेस आमदारांनी गोंधळ घालत सभात्याग केला.