मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस पिऊन जरांगे पाटलांनी 17 व्या दिवशी उपोषण सोडले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटले आहे.
मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मनोजला मी गेल्या अनेक वर्षापासून ओळखतो. आमरण उपोषण करणे सोपे नाही. मराठ्यांना आरक्षण देणं ही सरकारचीही इच्छा. त्याने वैयक्तीक फायद्यासाठी कोणताही प्रश्न मांडला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा समाजाबद्दलच आग्रही भूमिका मांडली. पहिल्या दिवसापासून लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, असे शिंदेंनी सांगितले.