Devendra Fadnavis : 'ही तर सामान्य माणसाची क्रूर थट्टाच'
मुंबई : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) दर गगनाला भिडत असतानाच शनिवारी केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला होता. अशातच आज राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. परंतु, यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
केंद्र शासनापाठोपाठ पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) कपात केली आहे. इंधनावरील दरात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. ते म्हणाले की, इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के आहे. इंधन दर कपातीत किमान 10 टक्के तरी भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात 'उंटाच्या तोंडात जिरे', असा निशाणा त्यांनी ठाकरे सरकावर साधला आहे.
अन्य राज्य सरकारे 7 ते 10 रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने 1.5 आणि 2 रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते, असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाने पेट्रोल आणि डिझेलवरील दर पेट्रोलचे साडेनऊ रुपये तर डिझेलचे दर ७ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. परंतु, तर राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. दरम्यान, आता राज्यानेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली आहे. अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वर्षला सुमारे २५०० कोटी रुपये राज्याचा महसूल बुडणार आहे.