हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर; 'त्या' घटनांचा उल्लेख करत फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन विरोधकांनी मोदींवर शरसंधान साधले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे केवळ संसद भवन नाही. 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्याच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे. हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
इंदिरा गांधींनी ज्यावेळी संसदेच्या ॲनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन केले, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? राजीव गांधीजी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का नाही झाली? एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते. सोनियाजी होत्या.
नितीश कुमार यांनी बिहार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळेस बहिष्कार का नाही घातला? त्यावेळी सांगायचे होते राज्यपालांनी उद्घाटन करावे, नितीश कुमारांनी करू नये. किंवा यूपीएचे सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहनसिंग आणि सोनिया गांधींनी तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन केले. तेव्हा ते तिथल्या राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही, अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्यावेळी हे लोक उद्घाटने करतात, त्यावेळी लोकतांत्रिक, अशा प्रश्नांची सरबत्ती देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केले, त्याचे उद्घाटन होत आहे. पहिल्यांदा देशात पूर्ण क्षमतेचे संसद भवन तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदी करत आहेत तर त्याच्यावर बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरणे मी दिली. त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही, याचे पहिल्यांदा उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत, असाही निशाणा त्यांनी केला आहे.