30 जूनला ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा; सत्ता संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री
devendra fadanvis governor bhagat singh koshyari : सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री झाली आहे. सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणीची मागणी केली जाणार असल्याचे समोर आले आहे. बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे. अशी ही माहिती समोर आली आहे. (devendra fadanvis meet governor bhagat singh koshyari over maharshtra political crisis)
येत्या ३० तारखेला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा, अशी मागणी भाजपा नेत्यांनी केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन आयोजित करुन बहुमत चाचणी घ्यावी. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही बहुमत चाचणी पूर्ण व्हावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि १० आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. दुसरीकडे शिंदे यांनी स्वत: आजचा एक दिवस उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्यासाठी दिला होता. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून चिडीचूप असलेले भाजपा नेते थेट राजभवनावर गेल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
भाजपाने हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर वेट अँड वॉचची भुमिका घेत असल्याचे जाहीर करत यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता. परंतू पडद्यामागे देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला जाऊन आले होते. शिंदेंनी बंड केले त्या दिवशी, नंतर एकदा आणि आज एकदा फडणवीस दिल्लीला गेले होते. यानंतर मुंबईत येताच भाजपाचे नेते फडणवीसांच्या निवासस्थानी जमले होते. तिथून हे नेते थेट राजभवनाकडे गेल्याने दिल्लीतून हिरवा सिग्नल आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.