उद्धव ठाकरे यांच्या सभेला आणि रिफायनरी समर्थनार्थ मोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारली
निसार शेख|राजापूर: बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरु होती. तर शनिवारी (दि.६) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान सभेला आणि रिफायनरी समर्थनार्थ आयोजित मोर्चाला प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या नक्की काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बारसू रिफायनरीचा संघर्ष पेटला असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. ६) राजापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते बारसुला भेट देणार असून त्यांचा दौरा यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. पदाधिकाऱ्यांनी आज (दि.५) कोंबे येथील हेलीपॅडची पाहणी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
याबाबत सूत्रांनी सांगितले की, उद्धव ठाकरे शनिवारी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. कोंबे येथे हेलिपॅड उभारण्यात आले आहे. तेथून ते राजापूरमार्गे बारसुला जाणार आहेत. परिसरातील कातळशिल्पे यांची पाहणी करुन रानतळे येथे ठाकरे प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, वैभव नाईक आदीसह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.