ठाकरे गटाला हायकोर्टाचा झटका, निवडणूक आयोगाविरोधातील याचिका फेटाळली
राज्यात राजकीय गदारोळ सुरु असताना, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. मात्र, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा झटका देणारी एक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे.
ठाकरेंच्या गटाने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी देखील सुनावणी झाली होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून यात कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वाची भूमिका मांडली होती. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयाबाबतचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात टाकला होता. आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या असे निवडणूक आयोगाला सांगू शकतो. याबाबत लेखी स्वरूपात उद्या तुमचं म्हणणं मांडा, अशी सूचना दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिली आहे.