ऐन थंडीत उदय सामंतांचा चढला पारा; माझ्या स्पीडने काम करा
निस्सार शेख | रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आढावा बैठकीत सामंताचा चांगलाच पारा चढलेला पाहायला मिळाला. नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना विकासकामांच्या तांत्रिक मंजुरीसाठी उशीर केल्याच्या मुद्द्यावरून जाब विचारला. यावेळी माझ्या स्पीडने काम करा, अशा सूचनाही नगरपरिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आता हा चर्चेचा विषय ठरत आहे.
चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ऑक्टोबर महिन्यात निधी मंजूर झालेला असतानाही प्रत्यक्ष कामाला सुरुवात का झाली नाही, असा सवाल पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना विचारला. त्यावेळी अजून कामाला तांत्रिक मंजुरी घेतली नसून आज त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अधिकारी गेले आहेत असे उत्तर आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांचा पारा वाढला. यावेळी मुख्यधिकाऱ्यांना सूचना करतानाच यापुढे असा ढिसाळ कारभार चालणार नाही. माझ्या स्पीडने काम करा, अशा सूचना देखील उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला आमदार शेखर निकम देखील उपस्थित होते.