...तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही; केसरकरांचे सूचक वक्तव्य
शिर्डी : नववर्षानिमित्त शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी साईबाबांचं दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल मला आदर आहे. मात्र, कटुता कमी करणं हे त्यांच्या हातात आहे, असे सूचक वक्तव्य केसरकरांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंचा आदर ठेवणारा मी माणूस आहे. जेव्हा घर पेटतं तेव्हा आधी आगीवर नियंत्रण मिळवावे लागते, आग कशामुळे लागली ते नंतर बघू, अगोदर आपलं घर सुरक्षित ठेवू, असे मी तेव्हा उद्धव ठाकरे यांना बोललो होतो. मात्र ते त्यांची लोक जे सांगतील त्यावर विश्वास ठेवत होते. मी जे बोलणार ते उद्धवजींबाबत नाही तर त्यांना जे फिडबॅक देतात त्यांना बोलणार आहे. मी लवकरच सर्व प्रश्नांना उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी लढा लढवला. ते सहजासहजी सोडून जात नाहीत. निश्चितपणे काहीतरी घडले आहे. ज्यामुळे आमदार बाहेर पडले. नेमकं काय घडले होते, याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही, असेही दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, दीपक केसरकर आणि उध्दव ठाकरे हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती मिळत आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदा समोर आलेल्या दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी जाब विचारला. तुम्ही असे कसे काय इतके निर्दयीपणे वागू शकता? आम्ही काय वाईट केलंय तुमचं? आम्ही काय कमी दिलं तुम्हाला? आमच्या चौकशा लावता? कार्यालय ताब्यात घेता, असे प्रश्नांची सरबत्तीच त्यांच्यावर केली. यावर दीपक केसरकरांनी तुम्ही अजूनही नाराज आहात का? अशी विचारणा केली.