दीपक केसरकरांना हवे आदित्य ठाकरेंचे पर्यटन खाते? अप्रत्यक्ष केली 'मन की बात'
कोल्हापूर : पर्यटन वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणतं खातं मला मिळणार हे माहित नाही. मात्र काम सुरू आहेत, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून दीपक केसरकर यांचा भर पर्यटन विभागावर राहत आहे. यामुळे आदित्य ठाकरेंची पर्यटन खाते मिळण्याची दीपक केसरकर यांची इच्छा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दीपक केसरकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकार स्थिर असून कोणताही धोका नाही. मतदार संघात जाण्यापूर्वी उदयनराजे भोसले व संभाजीराजे यांची भेट घेतली. काही गोष्टी घडल्या असतील. मात्र, छत्रपती यांना सन्मान देण्याची आमची भूमिका आहे. संभाजी राजेंनी ज्या संकल्पना मांडल्या. त्या प्रत्यक्षात कशा पूर्ण करता येईल याकडे लक्ष देण्यात येत आहे. छत्रपतींचा इतिहास जिवंत केला पाहिजे. कोल्हापूरचे पर्यटन वाढवण्यावर आमचा भर राहणार आहे. गडकोट यांचं संवर्धनाबाबतचे खातं केंद्राकडे आहे. मात्र आगामी मंत्री मंडळ बैठकीत विषय घेवू, असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाष्ट्राला सहकाराचा मोठा इतिहास आहे. तर, सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा होता. आपण काम सुरू करताना गुरूचे आशीर्वाद घेतो. साईबाबा माझे गुरू आहेत, असे म्हणत शिर्डी झिरो क्राईम सिटी करणार, असा निर्धार त्यांनी केला. याशिवाय अंबाबाई दर्शनाबाबतील अनेक सुविधा कशा देता येईल याबाबतीतही विचार सुरु आहे. राज्यातील देवस्थानाचे पावित्र्य राखलं पाहिजे, भाविकांना सुविधा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे. अजून विभागांचे वाटप झाले नाही, कोणतं खातं मला मिळणार हे माहित नाही. मात्र काम सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधीही अडीच वर्षे आदित्य ठाकरे यांनी पर्यटन खात्याचे काम केलं. पण, त्यानंतर आता आम्ही अडीच वर्ष आम्ही पर्यटन खात्याचे जास्तीत जास्त काम करू. त्यांना फिरताही येणार नाही, असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेने नेते आदित्य ठाकरे यांना लगावला होता. यामुळे आता अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.