निष्ठा कशी असावी हे फडणवीसांकडून शिकावं, बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्र्यांचं तोंडभरून कौतुक
पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम सुरु आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. निष्ठा कशी असावी हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. यासोबतच महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, निष्ठा कशी असावी हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. नाहीतर आपले कार्यकर्ते नगरसेवक पदाचे तिकीट दिलं नाही तर आम्ही किती वाईट आहे अस म्हणत पूर्ण कार्यक्रम करुन टाकतात. फक्त पुतळे जाळायचे बाकी ठेवतात, अशा कान पिचक्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्या आहेत.
दुसरीकडे फडणवीसांना पूर्ण जनतेचा पाठींबा असूनही महाराष्ट्र राज्यसारखं मुख्यमंत्री पद सोडून केंद्रीय नेतृत्वाच्या एका फोनवर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. किती जड अंतकरणाने हा निर्णय घेतला असेल. याची आम्ही साक्षीदार आहोत,असेही त्यांनी सांगितले आहे.
मागच्या सरकार कडून अपेक्षा नव्हत्या. मागील सरकार हे फेसबुक लाईव्ह सरकार होते. आताच सरकार हे 18 तास 13 कोटी जनतेकरिता काम करणार आहे, अशीही टीका चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविकास आघाडीवर केली आहे. सहा महिन्याच्या काळात शिंदे फडणवीस सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले. जनतेने देवेंद्र फडणवीस यांच नेतृत्व स्वीकारलं असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.