28 वर्षांनी कसब्यात भाजपचा गड ढासळला; फडणवीस म्हणाले, आम्ही पुन्हा येऊ
पुणे : कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला असून चिंचवडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. तर, 28 वर्षांनी भाजपचा बालेकिल्ला ढासाळला असून कसब्यात मविआने बाजी मारली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन भाष्य केले आहे.
चिंचवड विधानसभा क्षेत्रातून आमच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप या विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार मातो. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.
तर, कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार मानतो. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो. आपले आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा 1 लाख 35 हजार 434 मतांनी विजय झाला आहे. तर, मविआचे नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली आहेत. तर, बंडखोर आमदार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली आहेत. व कसब्यात मविआचे रवींद्र धंगेकरांना 73 हजार 197 मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या हेमंत रासनेंना 62 हजार 244 मते मिळाली आहेत.