महाविकास आघाडी सरकार असेल किंवा नसेल...; सत्ता जाण्यापूर्वीच भरणेंचे सांत्वनपर भाषण
अमोल धर्माधिकारी | इंदापूर : महाविकास आघाडी सरकार राहिले काय व न राहिले काय शेवटी तुमच्या तालुक्याचा आमदार मीच आहे, असे वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. त्यांचे संपूर्ण भाषण हे सत्ता जाण्यापूर्वीच सांत्वनपर भाषण असल्याचे दिसून आले आहे. ते इंदापूरमध्ये बोलत होते.
राज्यात अनेक प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे काहीही घडू शकते, असे सूचक वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. राज्यात दोन वर्षे कोरोनाचा काळ होता. त्यानंतर आता काही चांगले काम करता येईल, असे वाटले होते. मात्र, आता काही घडू शकते, असे म्हणत राज्यसरकारबाबत त्यांनी शंका व्यक्त केली आहे. सरकार राहिले काय व न राहिले काय शेवटी तुमच्या तालुक्याचा आमदार मीच आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या भाषणाने राजकिय चर्चांना उधाण आले आहे. दत्तात्रय भरणे यांना महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची कुणकुण लागली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यामुळे महाविकास आघाडी विरुध्द शिंदे गट अशी लढत न्यायालयात होणार आहे. यावेळी न्यायालयाच्या निकालावर शिंदे गटाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशातच राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.