खऱ्या विचारांचं सोनं पाडवा मेळाव्यातच ,मनसे आमदार राजू पाटील यांचा शिंदे गट आणि शिवसेनेला टोला
अमजद खान।कल्याण: राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यावरच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना व शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे.
पूर्वी दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटलं जायचं आता दोन ठिकाणी लोकांना काय लुटायचं ते लुटतील परंतु विचारांच खरं सोनं मनसेच्या पाडवा मेळाव्याला घ्यायला लोकं येत असतात. तिकडे ओढताण पण नसते. असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला लगावला आहे.
मनसे आमदार राजू पाटील हे मनसे पदाधिकारी हर्षद पाटील आणि इतर पदाधिकार्यांसमवेत केडीएमसी मुख्यालयात आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये पलावा सिटीच्या टॅक्समध्ये सूट, अमृत योजेन अंतर्गत सुरु असलेली कामं, केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था आदी विषयांवर चर्चा केली. पलावा सिटी मधील २५ हजार सदनिका धारकांना आता फक्त ३३ टक्के कर भरावा लागेल. ही दिलासादायक बातमी आहे.
अमृत योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामाचा लोकांना फायदा होणार असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली.खड्डे भरण्या ऐवजी रस्ते बनविण्यासाठी टेंडर काढा अशी सूचना देखील त्यांनी आयुक्तांना केली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. यावर बोलताना राजू पाटील म्हणाले कि, हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पक्ष वाढीसाठी नेते येत असतात. याच्यात काही कायदेशीर बाबी पण आहेत. असे ते बोलताना म्हणाले. समजा चिन्ह नाही मिळाले तर काही लोकांना सोयीस्कर पडावं यासाठी पण फेऱ्या असतील असा देखील टोला राजू पाटील यांनी लगावला.