सरकारवर टीका? पद्मश्री राहीबाई पोपरेंचा माईकच केला बंद
कल्पना नलस्कर | नागपूर : भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राहीबाई पोपेरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीदरम्यान घडलेल्या किस्सा सांगत अप्रत्यक्षपणे केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यामुळेच राहीबाई पोपेरे यांचं भाषण थांबवण्यात आल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली.
नेमके काय घडले?
बीज माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे यांचे भाषण भारतीय विज्ञान काँग्रेसच्या, शेतकरी विज्ञान काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, अजून माझ्या गावाला रस्ताही नाही. उन्हाळ्यात प्यायला पाणी नसतं. खूप लोक येतात. माझ्या घराच्या उद्घाटनाला चंद्रकांत पाटील येणार होते. मी त्यांना म्हणाले, महिला वरून जाताना विमान बघतात. उद्घाटनाला यायचं असेल, तर इथेच हेलिकॉप्टर उतरवा. त्यांनी तिथंच हेलिकॉप्टर उतरवलं. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतरही गावात कुठलाही फरक पडला नाही. बीज माता म्हणून जरी प्रसिद्धी मिळाली असली तरी माझ्या गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नसल्याची खंत यावेळी राहीबाई पोपरे यांनी भाषणातून व्यक्त केली, असं राहीबाई म्हणाल्या.
त्यानंतर भारतीय सायन्स काँग्रेसच्या समन्वयक आणि भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना पांडे या राहीबाई पोपेरे यांच्याजवळ आल्या. त्यांनी राहीबाई पोपेरे यांचा माईक बंद केला आणि त्यानंतर त्यांना भाषण संपवायला सांगितलं. त्यानंतर राहीबाई पोपेरे यांनी भाषण थांबवलं.