ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर कोर्टाचा मोठा निर्णय, समता पक्षाची याचिका फेटाळली
अंधेरी पोटनिवडणुकीवरून सध्या प्रचंड राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. अशातच या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाला निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्हे देण्यात आली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या मशाल' चिन्हाविरोधात समता पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र आता समता पक्षाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे, आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह हे पेटती मशाल हेच राहणार आहे.
शिवसेनेतील झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना कोणाची हा वाद कोर्टातून निवडणूक आयोगात गेला आहे. त्यानंतर तात्पुरता निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव दिलं. तर एकनाथ शिंदे गटाला 'ढाल आणि तलावर' हे निवडणूक चिन्ह देत गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव दिले आहे.
परंतु उद्धव ठाकरे गटाच्या मशाल या निवडणूक चिन्हावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने आक्षेप घेतला होता. सोबतच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला मशाला चिन्ह देऊ नये आणि हे चिन्ह रद्द करावे अशी मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळून समता पक्षाला झटका दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.