जितेंद्र आव्हाड यांना कोर्टाकडून अटक पूर्व जामीन मंजूर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. याच विनयभंगाच्या गुन्ह्यावर आज ठाणे कोर्टात सुनावणी झाली आहे. मात्र, आव्हाडांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ठाणे कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
ठाणे पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच प्रकरणात आव्हाड यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान 354 नुसार दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा असतो. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आव्हाड यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने अंतरिम आदेश देताना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर आज, सकाळी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली.