गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचे विधान
नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारीनंतर भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले होते. याविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढत याचा निषेध केला. परंतु, त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची भर पडली आहे. गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीसांनी म्हंटले आहे. यामुळे पुन्हा वादाला फोडणी मिळाली आहे.
आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली. न्यायमूर्ती म्हणून अॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी भूमिका बजावली. संस्थेच्या प्रथम अध्यक्ष ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतिनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अमृता म्हणाल्या, मी स्वतःहून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. राजकीय वक्तव्य जास्त करीत नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे.
दरम्यान, याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हंटले होते. त्यावर कमेंट्स करत नेटीझन्सनी फडणवीस यांना मोठ्या प्रमाणमात ट्रोल केले होते. तर, राजकीय वर्तुळातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता त्यांनी पुन्हा आपल्या विधानाचा पुर्नच्चार केला आहे.