बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
मुंबई : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद विकोपाला गेला असल्याचीही माहिती मिळत आहे. यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भातील माहिती कॉंग्रेस प्रवक्त्यांनी ट्विट करत दिले आहे.
कॉंग्रेसच्या नाराजींच्या चर्चांमध्ये कॉंग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गेले चार महिने अतिशय खालच्या थराला जाऊन शिवसेनेतून पळ काढून (so called original निष्ठावंतानी) आपल्याच घराची पार इज्जत काढली. मग, कॉंग्रेस तर का मागे राहील. सगळंच अगम्य आहे. आज सकाळी सकाळी फोन आला "ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे की नानांच्या कॉंग्रेसचे? आता काय उत्तर देऊ कप्पाळ, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. यामुळे कॉंग्रेस आता कोणते राजकीय वळण घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये आलबेल नसल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच, नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन त्वरित हटवावे, असे निवेदन माजी आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंकडे केली होती. तर, बाळासाहेब थोरातांनी आज अधिकृतपणे भूमिका मांडत नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. विधान परिषद निवडणुकीत राजकारण झालं. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. सार्वजनिकरित्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यात आली. माझ्या विषयी इतका राग असेल तर नाना पटोले यांच्याबरोबर काम करू शकत नाही. तसेच परिस्थिती अशीच राहिली तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.