पुण्यात किरीट सोमैय्यांविरोधात काँग्रेस आक्रमक; दाखविले काळे झेंडे
पुणे : भाजप नेते किरीट सोमैय्या सध्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. या प्रकरणावरुन त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन टीका करण्यात आली होती. तर, विरोधकांनी सोमैय्यांवर कारवाईची मागणी केली होती. अशातच, किरीट सोमैय्या आज पुण्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमैय्यांविरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली असून जोरदार आंदोलन केले आहे.
पर्वती येथे किरीट सोमैय्या पर्वती येथे खाजगी भेटीसाठी आले आहेत. त्याआधी पर्वती येथील चौकात काँग्रेस आंदोलनाच्या पावित्र्यात होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमैय्यांची गाडी दिसताच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सोमय्या गो बॅकचे फलक घेऊन आंदोलन केले आणि सोमय्यांना काळे झेंडे दाखविले.
दरम्यान, किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. तर, सोमैय्यांच्या व्हिडीओची दखल अधिवेशनातही घेण्यात आली असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमैय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असे फडणवीसांनी अधिवेशनात म्हंटले होते.