काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; पत्रात म्हणाले...
काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर धीरज देशमुख यांनी हे पत्र लिहिलं आहे.
या पत्रात धीरज देशमुख म्हणाले की, माननीय महोदय, वरील विषयानुसार आपणास विनंती करण्यात येते की, मा. श्री. मनोज जरागे-पाटील हे मराठा समाजाला आरक्षण आणि त्याच्याशी निगडीत मागण्याच्या पूर्ततेसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे १७/०९/२०२४ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत, आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.
श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या खालावत चाललेल्या तब्येतीची तातडीने राज्य सरकारने दखल घेणे गरजेचे आहे. समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे. त्यातून बीड, धाराशिव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यानंतर लातूरमध्येही बंद पुकारण्यात आला आहे. म्हणून सरकारने श्री. मनोज जरांगे-पाटील यांच्याशी बोलणी करून लवकरात लवकर तोडगा काढायला हवा आणि समाजाला न्याय द्यायला हवा, अशी आमची मागणी आहे. असे पत्रात म्हटले आहे.