शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस नेत्यांची लागणार वर्णी?
मुंबई : शिंदे सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्याने मिनी मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. यामध्ये 20 मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर, यात कॉंग्रेस नेते-मंत्र्याचा समावेश होणार असण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार कोण असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूचक विधान केले होते. या मंत्रिमंडळ विस्तारात वीस मंत्र्यांची वर्णी लागू शकते. यासाठी आमदारांनी तयारी करण्यास सुरुवात केले आहे. परंतु, अशातच शिंदे सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेस गटातील दोन माजी मंत्र्यांचा समावेश होण्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर उभी असून कोणते आमदार फुटणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. काहींनी ही नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तर, अपक्षांना सहहभागी करुन न घेतल्याने बच्चू कडूंनीही शिंदे सरकाराला इशारा दिला होता. अशातच कॉंग्रेस मंत्रीही आता मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने शिंदे गटाची काय प्रतिक्रिया असणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.