तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला, नाना पटोलेंनी व्यक्त केला संताप
राज्यात सध्या एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना, दुसरीकडे राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला होता. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. यावरून काल राजकीय वर्तुळात एकच गदारोळ निर्माण झाला होता. त्यावरच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नागपुरामध्ये बोलताना आज नाना पटोले म्हणाले की, ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने एबी फॉर्म दिला असताना देखील सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. अपक्ष म्हणून त्यांच्या मुलानी उमेदवारी भरली. दुसरीकडे भाजपने या ठिकाणी उमेदवार दिला नाही. आणि तांबे हे भाजपकडे पाठिंबा मागतात. म्हणजेच याचा अर्थ असा की, सर्व आधी ठरलेले होते. हा धोका पक्ष विसरणार नाही आणि ही निवडणूक काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीत पदवीधर लोक मतदार आहेत आणि ते काही मूर्ख नाहीत. त्यांनाही कळते की दगाफटका करणाऱ्यांसोबत यशस्वी होणार नाही. असे देखील इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला आहे.